मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. जरांगे पाटील यांचा मोर्चा जालन्यातील अंतरवाली सराटी येथून नवीन मुंबईत पोहोचला होता. आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईतील आझाद मैदानात जाऊन आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला होता. मात्र अखेर राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले आहे. मात्र खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचे दार ठोठावू असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने काढलेला अध्यादेश या विरुद्ध सदावर्ते कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ”खुल्या वर्गातील मग ते ब्राम्हण, जैन, वैश्य तसेच मागासवर्गीयांमधील गुणवंत असतील त्यांच्या अधिकाराच्या जागा शाबूत ठेवणे, त्यावर गदा न येऊ देणे ही माझ्यावर जबाबदारी आहे. आमचे मराठा भाऊ जे EWS च्या आरक्षणाचे लाभदायक आहेत, ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीने उभारलेले हे आंदोलन होते असे मी समजतो. मात्र आजचे नोटिफिकेशन आपण पहिले तर नोटिफिकेशन नोटीस आहे. त्याबाबतीत आम्ही लवकरच न्यायालयाचेदार ठोठावण्यात येईल. ”
गेल्या साडे चार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ लढा देत होते. तसेच २० जानेवारी पर्यंत आरक्षण न दिल्यास मुंबईत येऊन आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. २० तारखेपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्याने अखेर त्यांनी मुंबईकडे कूच केले. नवी मुंबईत त्यांचा मोर्चा येईपर्यंत सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करत होते. अखेर त्याला यश प्राप्त झाले आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून त्याबद्दलचा अध्यादेश आणि राजपत्र काढले आहे. दरम्यान, थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांच्यासह वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार अशी शपथ घेतली होती. अखेर राज्य सरकारने अध्यादेश काढत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.