बिहारमध्ये राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज (28 जानेवारी) मुख्यमंत्री नितीश कुमार हे महाआघाडीशी संबंध तोडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज सकाळी 10 वाजता जनता दल (युनायटेड) आमदारांच्या बैठकीला संबोधित करतील आणि राजभवनात राजीनामा सादर करतील आणि त्यानंतर ते भाजपमध्ये सामील होणार आहेत. तसेच ते 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यातील राजकीय गोंधळावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अद्यापही मौन बाळगले आहे. शनिवारी सकाळी पाटणा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर अग्निशमन दलाच्या नवीन इंजिनला हिरवा झेंडा दाखवण्याबरोबरच नितीश यांनी बक्सर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध मंदिराच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटनही केले होते. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या अखत्यारीतील पर्यटन विभागाचा हा प्रकल्प आहे, परंतु तेजस्वी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
नितीश कुमार यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी भाजपशी संबंध तोडून महाआघाडीत सामील झाले होते आणि त्यानंतर त्यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पराभव करण्याचे वचन दिले होते. तर आता नितीश पुन्हा बाजू बदलत असल्याच्या चर्चंदरम्यान, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) ने शनिवारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आगामी काळात पावले उचलण्यासाठी त्यांच्या नेत्यांची बैठक घेतली.