बिहारच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवन येथे राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. नितीश कुमार यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे. तसेच नितीश कुमार आज संध्याकाळी 5 वाजता बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असे म्हटले जात आहे. सोबतच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा शपथविधीला उपस्थित राहू शकतात अशी माहितीही समोर आली आहे.
राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याआधी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनता दल युनायटेडच्या आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा करण्यात आली तसेच नितीश यांनी त्यांच्या राजीनाम्याची बाब आमदारांसमोर ठेवली. त्यानंतर एकमताने आमदारांनी नितीश कुमारांना पाठिंबा दिला.
या बैठकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून राजभवनाकडे रवाना झाले आणि राजभवनात पोहोचल्यानंतर त्यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. तसेच भाजपच्या पाठिंब्याने नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.