मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. जर पंतप्रधान मोदी स्वत:च्या राज्याबद्दलचे प्रेम लपवू शकत नसतील तर तुम्ही आम्ही ते का लपवता? असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ते आज विश्व मराठी संमेलनात बोलत होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी या विषयावर बोलत आहे. या विषयासाठी मी अनेक केसेस अंगावर घेतल्या आहेत तसेच जेलमध्ये देखील गेलो आहे. तसेच मराठीबद्दल बोलल्यानंतर कोणीतरी संकुचित आहेत म्हणेल. पण देशाच्या पंतप्रधान मोदींनी त्यांच्या राज्याबद्दल, भाषेबद्दल वाटते की जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही मोठा पुतळा गुजरातमध्ये बांधावा. हिऱ्यांचा व्यापारही गुजरातमध्ये घेऊन जावा असे त्यांना वाटते. पण यावर माझे असे म्हणणे आहे की, पंतप्रधानांना स्वत:च्या राज्याबद्दलचे प्रेम लपवता येत नसेल तर तुम्ही आम्ही का लपवतोय? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
माझ्या राज्यात एखादा मराठी माणूस घर घ्यायला जातो आणि त्या सोसायटीतील जैन माणूस त्या मराठी माणसाला घर देणार नाही असे सांगतो. पैसे असूनही घर दिले जात नाही. हे फक्त महाराष्ट्रात होते कारण आपले बोटचेपे धोरण, आपण सगळे आधीच मागे हटतो, असेही राज ठाकरे म्हणाले.