मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेवरून पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ते आज विश्व मराठी संमेलनात बोलत होते. यावेळी राज ठाकरेंनी मराठीत बोला असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले. तसेच महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी, अशी मागणीही राज ठाकरेंनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.
राज ठाकरे म्हणाले, जेव्हा महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेऐवजी हिंदी भाषा ऐकू येते तेव्हा त्रास होतो. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही पण हिंदी आपली राष्ट्र भाषा नाही. मराठी, तामीळ भाषांप्रमाणे हिंदी उत्तम भाषा आहे पण ती आपली राष्ट्र भाषा नाही. तसेच पंतप्रधान मोदींना गुजरातविषयी प्रेम असेल तर आपण मराठी लोक मागे का आहोत? त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये 10वी पर्यंत मराठी भाषेची सक्ती करावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
सरकारतर्फे महाराष्ट्रातील जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करा. एवढेच फक्त मराठी भाषेवर उपकार करावेत, बाकी आम्ही सर्व पाहु, असेही राज ठाकरे म्हणाले.