नुकताच वक्फ बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये आता रामायणाचे धडे दिले जाणार आहेत. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या एकूण 117 मदरशांपैकी 4 मदरशांमध्ये रामायणाचा अभ्यासक्रम म्हणून समावेश केला जाणार आहे.
उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले की, मदरशांमध्ये रामायण वाचल्यामुळे मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल. तसेच मुलांना श्रीरामाचे चरित्र जाणून घेण्याची संधी मिळेल. सोबतच मदरशातील मुलांचा ड्रेसकोड देखील बदलण्यात येणार आहे.
आम्ही कुराणसोबत विद्र्यार्थ्यांना रामायण देखील शिकवू. तसेच वक्फ बोर्ड चार मदरशांसाठी मुख्यध्यापकांची नियुक्ती करेल, ज्यांना या विषयामध्ये पारंगत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे काम दिले जाईल. तसेच नवीन अभ्यासक्रमाच्या परिचयासाठी विस्तृत व्यवस्थाही करण्यात येत आहे, असेही अध्यक्षांनी सांगितले.
सुरूवातीला बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी हरिद्वार, डेहराडून, नैनिताल आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये नवीन अभ्याक्रम सुरू केला जाणार आहे. तसेच उर्वरित 113 मदरशांमध्ये शिक्षकांची भरती झाल्यानंतर ही नियुक्ती केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.