तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांच्या नागरिकत्व (CAA) कायद्याच्या अंमलबजावणीत केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. ममता बॅनर्जी कुचबिहार जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी पूर्वेकडील राज्यातील सीमावर्ती भागातील लोकांना भाजपची “बनावट ओळखपत्रे” स्वीकारू नयेत, असे आवाहन केले. असे झाल्यास येथील नागरिक एनआरसीच्या कक्षेत येतील असे त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या, ”आता ते (भाजपा) CAA च्या घोषणा देत आहे. हे राजकारण आहे. आम्ही प्रत्येकाला नागरिकत्व दिले आहे आणि त्यांना (सीमाभागातील लोकांना) सर्व काही मिळत आहे. ते नागरिक आहेत, म्हणूनच त्यांना मतदान करण्याची परवानगी आहे.” शंतनू ठाकूर यांनी सीएए हा कायदाकेवळ बंगालचा नव्हे तर संपूर्ण भारतात येत्या सात दिवसांमध्ये लागू होईल असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान हे वृत्त इंडिया टुडे ने दिले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर दक्षिण 24 परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत म्हणाले, ”मी खात्रीने सांगतो की येत्या सात दिवसांमध्ये CAA कायदा केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये लागू होईल.”