भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी रूरकीहून नवी दिल्लीला जात असताना ऋषभचा अपघात झाला होता. या अपघातात ऋषभच्या कपाळावर जखमा झाल्या होत्या तर उजव्या गुडघ्याचा लिंगामेंट फाटला होता. त्यामुळे तेव्हापासून ऋषभ क्रिकेटपासून दूर आहे. अशातच आता त्याने त्याच्या या भीषण अपघाताबाबत पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
स्टार स्पोर्टसशी बोलताना ऋषभ म्हणाला की, “हा अपघात झाला त्यावेळी मला वाटले की आता या जगातील माझे आयुष्य संपले. पण सुदैवाने मी खूप नशीबवान होतो म्हणून वाचलो. मला डॉक्टरांनी सांगितले होते की, तुला बरे होण्यासाठी 16 ते 18 महिने लागतील. तसेच आता मला दुसरे जीवन मिळाले आहे. मी भाग्यवान आहे कारण असे दुसरे जीवन प्रत्येकाला मिळत नाही.”
ऋषभचा अपघात होऊन आता एक वर्ष झाले आहे. तसेच तो पूर्ण बरा देखील झाला आहे. त्यामुळे लवकरच तो मैदानात परतणार आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या टेबलावर बसून बोली लावताना दिसला होता.
दरम्यान, ऋषभ पंतने 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांच्या मदतीने 987 धावा केल्या होत्या. तर आत्तापर्यंत त्याने 33 कसोटी सामन्यांमध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतके तसेच 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत.