मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईला यश आले आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा राज्य सरकारने अध्यादेश देखील काढला आहे. मात्र आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळणार आहेत. या निर्णयामुळे ओबीसी समाजचे काही नेते आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ हे देखील ओबीसींवर अन्याय झाला अशी भूमिका आक्रमकपणे मांडत आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी देखील ओबीसी नेत्यांनी दर्शवली आहे. आता मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर व मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, ”एका बाजूला ओबीसींमधूनच आरक्षण मागायचे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील तुमची औकात काय? आपण अवश्य कोर्टात भेटू. असेही तुम्ही डुप्लिकेटपणा करून सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटचे उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी केली आहेच. मुख्यमंत्र्यांनी संविधानिक पदावर राहून पदाचा गैरवापर केलेला आहे. मनोज जरांगे पाटील कोर्टात आपण अवश्य भेटू.”
दरम्यान, मराठा-ओबीसी समाजामधील वाद हा वाढण्याची शक्यता आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींवर कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्याय होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भुजबळांशी याबाबत चर्चा देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने अध्यादेश काढत सगेसोयरे ही मराठा समाजाची आणि मनोज जरंगे पाटलांची मागणी मान्य केली आहे. यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे असे अनेक ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. तर या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याबाबत देखील विचारविनिमय सुरु असल्याचे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे.