पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एक मोठा खुलासा केला आहे. झोपायला गेल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात त्यांना गाढ झोप येते, याबाबतचे रहस्य त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केले आहे.
नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे ‘परीक्षा पे चर्चा’च्या सातव्या आवृत्तीदरम्यान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, झोपेच्या वेळी ‘स्क्रीन टाइम’ विद्यार्थ्यांचे नुकसान करतो. रिल्सच्या व्यसनाधीन विद्यार्थ्यांना ‘स्क्रीन टाइम’ विरुद्ध सावध केले पाहीजे, ज्यामुळे त्यांच्या झोपेमध्ये व्यत्यय येत असतो.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “संतुलित जीवनशैली राखण्यासाठी, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक टाळला पाहिजे. निरोगी मनासाठी निरोगी शरीर महत्वाचे आहे आणि त्यासाठी काही दिनचर्या, सूर्यप्रकाशात वेळ घालवणे आणि नियमित आणि पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे. स्क्रीन टाइम सारख्या सवयींमुळे झोपेची आवश्यक वेळ कमी होत आहे, जी आधुनिक आरोग्य विज्ञानाने खूप महत्त्वाची मानली आहे,”
“मी झोपल्यानंतर 30 सेकंदांच्या आत गाढ झोपेत जाण्याचा नित्यक्रम पाळला आहे. म्हणजेच जागे असताना पूर्णपणे जागे राहणे आणि झोपताना गाढ झोप घेणे हे संतुलन साधले जाऊ शकते”, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.