झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हेमंत सोरेन नेमके गेले कुठे याबाबत कुणालाही माहिती नाहीये. भूखंड घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन अडचणीत आले आहेत. त्यांना ईडीकडून कधीही अटक होऊ शकते. मात्र, त्यापूर्वी मुख्यमंत्री सोरेन बेपत्ता झाले आहेत.
ईडीचे अधिकारी मुख्यमंत्री सोरेन यांची वाट पाहत आहेत. अशातच आता सोरेन यांना शोधून देणाऱ्यास भाजपने मोठे बक्षिस जाहीर केले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.
सोरेन हे बेपत्ता झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, झारखंडच्या जनतेने सोरेन यांचा शोध घ्यावा. मुख्यमंत्री सोरेन हे ईडीच्या भीतीने गायब झाले आहेत. गेल्या 40 तासांपासून त्यांचा शोध लागत नाहीये. मुख्यमंत्री आपले तोंड लपवून फिरत आहेत, अशी टीका मरांडी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सोरेन यांच्या बेपत्ता होण्याने त्यांच्या सुरक्षेला धोका आहे. सोबतच झारखंडच्या जनतेच्या सुरक्षेला देखील धोका आहे. झारखंडच्या जनतेची इज्जत आणि त्यांच्या मानसन्मानालाही धोका आहे. त्यामुळे सोरेन यांना शोधून देणाऱ्याला आणि त्यांना सहीसलामत घेऊन येणाऱ्याला अकरा हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.
https://twitter.com/yourBabulal/status/1752193911123280170
बाबूलाल मरांडी यांनी आपल्या पोस्टमध्ये झारखंडच्या लोकांना मार्मिक अपील केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी मुख्यमंत्री सोरेन यांचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोखाली त्यांनी बेपत्ता असे लिहिले आहे.