पाकिस्तानच्या न्यायालयाने देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना गोपनीयतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही राज्याची गुपिते लीक केल्याप्रकरणी दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबतची माहिती इम्रान खान यांच्या पक्षाने दिली आहे. इम्रान खान आणि इतर प्रमुख नेते 9 मे रोजी झालेल्या हिंसाचार आणि गोपनीय राजनैतिक दस्तऐवज उघड केल्याबद्दल गोपनीयता कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुरुंगात आहेत आणि आता हा तुरुंगवास आणखी वाढला आहे.
‘सिफर’ प्रकरण गोपनीय राजनैतिक कागदपत्रांच्या खुलासाशी संबंधित आहे. इम्रान खान यांनी 27 मार्च 2022 रोजी एका जाहीर सभेत अमेरिकेचे नाव घेतले होते आणि दावा केला होता की, मला सत्तेतून बेदखल करण्यामागे अमेरिकाचा हात आहे. मला वॉशिंग्टन येथील एका अम्बेसीने एक गुप्त टेप पाठवली होती, असा दावाही इम्रान खान यांनी केला होता. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त गोष्टी सार्वजनिक केल्या होत्या, त्याला सिफर असे म्हटले जाते.
9 मे 2023 रोजी निमलष्करी रेंजर्सनी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर इस्लामाबादमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर झालेल्या हिंसक निषेधांमध्ये रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयासह 20 हून अधिक लष्करी आस्थापना आणि राज्य इमारतींचे नुकसान झाले होते.