पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. येत्या 19 फेब्रुवरीला ते पुणे शहरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवजयांतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पुण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
19 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती असल्याने पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होण्याची शक्यता आहे. सोबतच ते पुणे विमानतळावर नव्याने झालेल्या टर्मिनलचे उद्घाटनही करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अवघ्या चार महिन्यांमध्ये हा तिसरा पुणे दौरा आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान मोदी यांना टीळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात त्यांचा एक धावता दौरा झाला होता. तर आता ते पुन्हा एकदा पुणे शहर दौऱ्यावर येणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भारतातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे सोलापुरात उद्घाटन झाले होते. 19 जानेवारीला सोलापुरातील रे नगर भागात या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. तर गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी मुंबई येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा पुणे शहर दौऱ्यावर येत असल्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे.