पुण्याच्या गोखलेनगर परिसरातील आशानगर येथे महापालिकेने पाण्याची टाकी उभारली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पाण्याच्या टाकीचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या संबंधित कार्यक्रमास काँग्रेसला डावलल्याचा आरोप करत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्याप्रकरणी आता रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्याचे प्रकरण चांगलेच भोवले आहे. यानंतर महापालिकेचा अभियंता संघ यांनी या कृतीचा निषेध नोंदवला. त्यानंतर रवींद्र धंगेकरांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या अभियंता संघाने रवींद्र धंगेकरांनी केलेल्या शिवीगाळीच्या कृतीचा निषेध नोंदवला. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी, भाजपा आमदार सुनील कांबळेंवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र धंगेकरांचा शिवीगाळ करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.