या महिन्याच्या ५ तारखेला कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची भरदिवसा गोळ्या घालू हत्या करण्यात आली होती. त्या दिवशी शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस होता. भरदिवसा पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये ही घटना घडली होती. हल्ल्यानंतर शरद मोहोळ याला खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यायत आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. मात्र या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयात आज सुनावणी पार पडली.
शरद मोहोळ हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अटकपूर्व जमिनीचे संरक्षण देता येणार नाही असा आदेश न्यायालयाने दिला आहे. मारणे याच्या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींवर पुणे पोलिसांनी मोक्का लावला आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांनी एक परिपत्रक जारी केले आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ आरोपींवर मोक्का लावण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला होता. आरोपींना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर यामध्ये विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी आयुक्त रितेश कुमार यांच्याजडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर सर्व प्रकारची पडताळणी करून आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपींवर मोक्का लावण्याचे आदेश दिले आहेत.