ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ही मोठी घोषणा करत मुख्यमंत्री शिंदेंनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदन केले. अभिनंदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “अशोक सराफ यांनी फक्त विनोदीच नाही तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी भूमिकांपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या अभिनयाने रसिकांवर अधिराज्य गाजवले आहे.”
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर होताच अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली. “हा पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. तो पुरस्कार मला जाहीर झाला याचा मला अतिशय आनंद आहे. मला एका मोठ्या स्थानावर नेऊन बसवल्याचा आनंद होत आहे. माझी इंडस्ट्रीतील 50 वर्षे सत्कार्णी लागली असल्याचे मला समाधान वाटत आहे. तसेच आपली कामगिरी कुठेतरी रूजू होत आहे याचाही आनंद झाला आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार अनेक दिग्गजांना जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबत आता मला हा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे”, असे अशोक सराफ म्हणाले.
अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यांचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे.