अंतरिम अर्थसंकल्प 2024 पूर्वी केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता मोबाईल फोन स्वस्त होणार आहेत. बजेटपूर्वी केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी केले आहे.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सरकारने मोबाईल उत्पादनाबाबत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, मोबाईल उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या घटकांवर आयात शुल्कात 10% सूट देण्यात आली आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.
भारतातून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. 10 टक्के सुधारित आयात शुल्क दर मोबाईल फोन असेंबलीसाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांवर लागू होईल.
सरकारने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार यामध्ये बॅटरी कव्हर, मेन लेन्स, बॅक कव्हर आणि प्लास्टिक आणि धातूपासून बनवलेले मोबाईल पार्ट्स यांचा समावेश आहे. हा निर्णय या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या अलीकडील अहवालांच्या अनुषंगाने आहे. या अहवालानुसार, उच्च श्रेणीतील मोबाइल फोनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोबाइल पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याचा सरकार विचार करत आहे.
या कपातीचा परिणाम मोबाईल फोन उद्योगावर दिसून येणार आहे. या निर्णयानंतर भारताच्या मोबाईल फोन उद्योगाला जागतिक बाजारपेठेत वाढ अपेक्षित आहे.