अंतरिम अर्थसंकल्प 2024 गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (31 जानेवारी) सुरूवात झाली आहे आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवीन संसदेत प्रथमच दोन्ही सभागृहांच्या (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्यांना संबोधित करत आहेत. तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, या नवीन संसद भवनात बोलावलेल्या पहिल्या सत्राच्या शेवटी, संसदेने एक सुंदर निर्णय घेतला – नारी शक्ती वंदन कायदा. त्यानंतर 26 जानेवारीला देशाने स्त्रीशक्तीचे सामर्थ्य, तिचे शौर्य, तिच्या संकल्पाची ताकद कशी अनुभवली हे पाहिले. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत , हा एकप्रकारे स्त्रीशक्तीचा उत्सवच आहे.
निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे, त्यामुळे आम्हीही ती परंपरा पाळू, असे पंतप्रधान म्हणाले. नवे सरकार आल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्पही आणू, असेही ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ‘मार्गदर्शक तत्त्वां’सह अर्थसंकल्प सादर करतील. माझा ठाम विश्वास आहे की देश दररोज प्रगतीची नवीन शिखरे पार करत पुढे जात आहे.
यावेळी पीएम मोदींनी विरोधकांवरही निशाणा साधला आणि म्हणाले की, “गेल्या 10 वर्षात प्रत्येकाने संसदेत आपल्याला वाटेल त्या पद्धतीने काम केले. ज्यांना गोंगाट करण्याची सवय झाली आहे, ते त्यांच्या खासदार असताना त्यांनी काय केले ते आत्मपरीक्षण करतील. तसेच ज्यांनी संसदेत सकारात्मक योगदान दिले ते प्रत्येकजण लक्षात ठेवेल, परंतु ज्यांनी संसदेत व्यत्यय आणला ते क्वचितच लक्षात असतील. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे पश्चात्ताप करण्याची आणि सकारात्मक पाऊल टाकण्याची संधी आहे. मी सर्व खासदारांना विनंती करतो की, ही संधी हातातून जाऊ देऊ नका आणि सर्वतोपरी प्रयत्न करा.”