अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (31 जानेवारी) सुरूवात झाली आहे आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन संसदेत प्रथमच दोन्ही सभागृहांच्या (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्यांना संबोधित केले. यानिमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन संसद भवनात प्रथमच प्रवेश केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कामकाजाची आणि आर्थिक धोरणांची रूपरेषा मांडली.
नवीन संसद भवनात भाषण करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, संसदेच्या नवीन इमारतीतील हे माझे पहिले भाषण आहे. ही भव्य इमारत स्वातंत्र्याच्या अमर कालखंडाच्या सुरूवातीला बांधण्यात आली होती. एक भारत श्रेष्ठ भारताचा गंध इथे आहे. तसेच भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीचे भानही आहे. सोबतच आपल्या लोकशाही आणि संसदीय परंपरांचा आदर करण्याची प्रतिज्ञा देखील इथे आहे.
यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा
यंदाचा अर्थसंकल्प हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. त्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीच हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने तो पूर्ण स्वरूपात मांडता येणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण, या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत तो पूर्ण अर्थसंकल्प ठरणार नाही. ही तात्पुरती आर्थिक योजना किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ असेल. दरवर्षी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळीही अर्थसंकल्पासाठी हाच दिवस निश्चित करण्यात आला आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे हे अखेरचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, या नवीन संसद भवनात बोलावलेल्या पहिल्या सत्राच्या शेवटी, एका खासदाराने अतिशय सन्माजनक निर्णय घेतला तो म्हणजे नारी शक्ती वंदन कायदा. त्यानंतर 26 जानेवारीला देशाने स्त्रीशक्तीचे सामर्थ्य, तिचे शौर्य, तिच्या संकल्पाची ताकद कशी अनुभवली हे पाहिले. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत , हा एकप्रकारे स्त्रीशक्तीचा उत्सवच आहे.
निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे, त्यामुळे आम्हीही ती परंपरा पाळू, असे पंतप्रधान म्हणाले. नवे सरकार आल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्पही आणू, असेही ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ‘मार्गदर्शक तत्त्वां’सह अर्थसंकल्प सादर करतील. माझा ठाम विश्वास आहे की देश दररोज प्रगतीची नवीन शिखरे पार करत पुढे जात आहे.