रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी हे आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. १ फेब्रुवारी म्हणजे उद्याच दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे भाजपात प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दळवी भाजपात प्रवेश करणार आहेत. सूर्यकांत दळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे माजी आमदार आहेत. सूर्यकांत दळवी यांच्या पक्षातून जाण्याने कोकणात ठाकरे गटाला एक मोठा धक्का समजला जात आहे.
सूर्यकांत दळवी हे दापोली-खेड विधानसभा मतदारसंघातून तब्बल ५ वेळा आमदार राहिलेले आहेत. दळवी यांचे खेड-दापोली मतदारसंघात मोठे वर्चस्व मानले जाते. ठाकरे गटाचे कट्टर नेते अशी त्यांची ओळख आहे. सूर्यकांत दळवी हे रामदास कदम यांचे कट्टर विरोधक आहेत. २०१९ च्या निवडणुकीदरम्यान दळवी पक्षावर नाराज होते. २०१९ मध्ये दळवींनी रामदास कदम यांच्या विरोधात प्रचार केल्याचा चर्चा सुरु होत्या. २०१९ च्या निवडणुकीत निर्माण झालेली नाराजी अधिकच वाढल्याने दळवी ठाकरे गटाला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.