मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्रदीर्घ लढा उभारला आहे. २० जानेवारी रोजी त्यांनी सुरु केलेले आंदोलन मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले होते. मात्र नवी मुंबईमध्येच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. कारण मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे आता ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना, कुणबी प्रमाणपात्र मिळणार आहे. तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र मिळणार आहे. यावरून छगन भुजबळ आणि अन्य ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मराठ्यांच्या सग्यासोयऱ्यांच्या आदेशाला काही दगाफटका झाला तर मी मंडल कमिशनला चॅलेंज करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता. आता यावर छगन भुजबल यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या अध्यादेशाला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबतची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.
छगन भुजबळ हे माध्यमांशी संवाद साधत होते. जरांगे पाटलांनी दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, ”त्यांच्या एवढा ज्ञानी जो कोणी आहे तो या हिंदुस्तानात कोणी आहे का? त्यांची ताकद पण खूप आहे. तीन कोटी मराठा ते मुंबईत आणणार होते. ते पाहिले सर्वानी की, किती संख्या होती वाशीमध्ये. ज्याला लाख आणि कोटीमधला फरक समजत नाही अशी माणसे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहेत. त्यांनी ते अवश्य करावे. त्यांनी हिंमत असेल ना तर मांडलं आयोगाच्या विरोधात आवाज द्यावा, तसेच मंडल आयोगाविरुद्ध कारवाई करावी. माझे त्यांना आव्हान आहे की, हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला संपवून टाकण्याचे काम करून दाखवावे.
काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?
”कायदा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे. त्यांच्या माझ्याजवळ सह्या आहेत. मराठ्यांच्या सग्यासोयऱ्यांच्या आदेशाला काही दगाफटका झाला तर मी मंडल कमिशनला चॅलेंज करणार. ते बठक घेत आहेत ना, मग मी मंडल कमिशन चॅलेंज करणार. मात्र जोवर मी जिवंत आहे ना त्यांनी कितीही कोर्टात याचिका दाखल करुद्यात, काही करुद्यात. मी आहे तोपर्यंत मराठ्यांसाठी पुन्हा लढाई उभी करेन. मराठ्यांना सगळ्या घराघरात आरक्षण मिळवून देईन”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.