झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी होणार आहे. झारखंडमधील जमीन घोटाळ्यात झालेल्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणी कदाचित आज त्यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. ईडीच्या पथकाने सोमवारी सोरेन यांच्या निवासस्थानावर छापेमारी केली. मात्र हेमंत सोरेन यावेळी तिथे उपस्थित नव्हते. तब्बल ४० तास ते गायब होते. यावरून भाजपाने त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. झारखंड भाजपाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी हेमंत सोरेन यांच्यावर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी एक्स वर ‘बेपत्ता’ असे सोरेन यांचे पोस्टर शेअर केले. तसेच सोरेन यांची माहिती देणाऱ्याला ११ हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.
ईडी सोमवारी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोहोचली होती. ईडीने त्यांच्या निवास्थानातून एक आलिशान गाडी आणि काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यां आतापर्यंत ईडीने तब्बल १० वेळा समन्स जारी केले होते. अखेर आज त्यांची चौकशी केली जाणार आहे. ईडीने या प्रकरणामध्ये पहिल्यांदा २० जानेवारी रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जबाब नोंदवला होता. त्यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे सात तास त्यांचा जबाब नोंदवला. हा जबाब मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत नोंदवण्यात आला आहे. त्या दिवशी चौकशी पूर्ण झाले नसल्याने आज ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स पाठवले आहे. झारखंड मध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार आहेत. या पक्षाचे अध्यक्ष असलेले हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत. सोरेन यांनी झारखंडमधील सरकार अस्थिर करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केंद्रातील भाजपा सरकारने केला असल्याचा आरोप केला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, तपास यंत्रणांनी राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाच्या मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीचा भाग म्हणून सोरेन यांचे माध्यम सल्लागार, साहिबगंज जिल्ह्यातील अधिकारी आणि माजी आमदार यांच्या जागेवर छापे टाकले होते.ईडी २०२२ पासून राज्यातील बेकायदेशीर खाणकामातून निर्माण झालेल्या १०० कोटी रुपयांच्या गुन्ह्याची चौकशी करत आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत या प्रकरणात १४ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे. रंजन यांनी राज्याच्या समाज कल्याण विभागाचे संचालक आणि रांचीच्या उपयुक्त म्हणून काम केले होते.