पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता पाकिस्तानी न्यायालयाने तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इम्रान यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तोशखाना प्रकरणी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद असलेल्या इम्रान खान यांना शिक्षा सुनावण्यासाठी उत्तरदायित्व न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बशीर स्वतः पोहोचले होते. या निर्णयानुसार इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना 10 वर्षांपर्यंत कोणतेही सरकारी पद धारण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच इम्रान आणि बुशरा यांच्यावर 78-78 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
इम्रान खान यांच्यावर तोशखाना (स्टेट स्टोअर) प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तोशखाना हे पाकिस्तानमधील एका शासकीय विभागाचे नाव आहे. परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशखान्यात ठेवल्या जातात. तोशखाना नियमांनुसार, सरकारी अधिकारी किंमत मोजल्यानंतरच भेटवस्तू ठेवू शकतात. मात्र, इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू विकत पैसे मिळवले. तसेच त्यांनी मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखान विभागाला न दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, काल पाकिस्तानच्या न्यायालयाने देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना गोपनीयतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही राज्याची गुपिते लीक केल्याप्रकरणी दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
‘सिफर’ प्रकरण गोपनीय राजनैतिक कागदपत्रांच्या खुलासाशी संबंधित आहे. इम्रान खान यांनी 27 मार्च 2022 रोजी एका जाहीर सभेत अमेरिकेचे नाव घेतले होते आणि दावा केला होता की, मला सत्तेतून बेदखल करण्यामागे अमेरिकाचा हात आहे. मला वॉशिंग्टन येथील एका अम्बेसीने एक गुप्त टेप पाठवली होती, असा दावाही इम्रान खान यांनी केला होता. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त गोष्टी सार्वजनिक केल्या होत्या, त्याला सिफर असे म्हटले जाते.