देशातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचा दावा
नवी दिल्ली, 31 जानेवारी : भारत जागातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. तसेच गेल्या 10 वर्षात 25 कोटी गरिबीतून बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज, बुधवारी अभिभाषण करताना त्या बोलत होत्या.
याप्रसंगी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, भारतातील लोकांना राम मंदिर उभारणीची वर्षानुवर्षे अपेक्षा होती आणि आता हे स्वप्न पूर्ण झाले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या, मात्र, ते देखील हटवण्याचा निर्णय झाला. संसदेने तिहेरी तलाकविरोधात कायदा केला आहे. याच संसदेने शेजारी देशातून येणाऱ्या अत्याचारित नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा केला आहे. तसेच सरकारने मिशन मोडवर लाखो नोकऱ्या दिल्या आहेत. वन रँक वन पेन्शनची तरतूद केली आहे. भारतीय लष्करात प्रथमच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. देशातील तब्बल 25 कोटी लोकांची गरिबी दूर झाली असून देशातील उर्वरित लोकांसाठी हा आशेचा किरण आहे. त्यामुळे सध्या भारत योग्य दिशेने वाटचाल करत आहे. तसेच सरकार योग्य निर्णय घेत असल्याने आत्मविश्वास वाढत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
गेल्या 10 वर्षांत आपण भारताला पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे. भारताची निर्यात सुमारे 450 अब्ज डॉलरवरुन 775 बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. एफडीआय पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची विक्री चार पटीने वाढली असल्याचा उल्लेख देखील राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला आहे. दरम्यान, इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरणाऱ्यांच्या संख्येत दुप्पीट वाढ झाली असून ही संख्या 3.15 कोटींवरुन 8.15 कोटी झाली आहे. दशकभरापूर्वी देशात केवळ काहीसे स्टार्टअप होते. जे आज एक लाखांहून अधिक झाले आहेत. वर्षभरापूर्वी 94 हजार स्टार्टअपची नोंदणी झाली होती. जी गेल्या वर्षी 1.6 लाख झाली आहे. जीएसटी भरणाऱ्यांची संख्या 1.4 कोटींवर पोहचल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.
अर्थव्यवस्थेच्या बाबत राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘एक देश, एक कर’ या योजनेचे चांगले परिणाम दिसत आहेत. बँकांचे जाळे आणखी मजबूत झाले आहेत. बँकाचे एनपीएमध्ये घट झाली आहे. आधीच्या तुलनेत परकीय गुंतवणूक दुप्पट झाली आहे. सुशासन आणि पारदर्शकतेमुळे आर्थिक सुधारणा वेगाने होत आहेत. मेक इन इंडिया हे सर्वात मोठे अभियान बनले आहे. संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांची भागीदारी वाढली आहे. इज ऑफ डुइंग बिजनेसमध्येही सुधार झाला आहे. डिजिटल इंडियामुळे व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होत आहे. जगातील इतर देशही आता यूपीए सारखे व्यवहार अंमलात आणत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासोबतच मुर्मू म्हणाल्या की, आमच्या सरकारने मानव केंद्रीत विकासावर भर दिला. नागरिकांची प्रतिष्ठा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. संविधानाचे प्रत्येक अनुच्छेद हेच सांगते. आमच्या सरकारने सर्वात मागास जातींवर लक्ष केंद्रीत केले. त्यांच्यासाठी 24 हजार कोटींची पीएम जनमन योजना तयार केली. दिव्यांगजनासाठी सुगम्य भारत अभियान चालविले. भारताच्या प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न केला. तृतीयपंथीयांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कायदा मंजूर केल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले.