विरोधी पक्षातील गोंधळी खासदारांना कानपिचक्या
नवी दिल्ली, 31 जानेवारी : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, बुधवारी प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेतील गोंधळी खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आलेय. या खासदारांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन पश्चातापाची संधी असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला. तसेच संसदेत जनहितार्थ चांगले विचार मांडण्याचे आवाहन मोदींनी केले.
संदेत जाण्यापूर्वी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत ज्यांन-ज्यांना जो-जो मार्ग सुचला. त्याप्रकारे सर्वांनी संसदेत आपापले कार्य केले. मात्र, ज्यांचा स्वभावच गोंधळ घालण्याचा झाला आहे, ते आपल्या सवईंमुळे लोकशाही मूल्यांचे वस्त्रहरण करतात. असे सर्व माननीय खासदार, आज जेव्हा अखेरच्या सत्रात एकत्र येत आहेत, तेव्हा नक्कीच आत्मपरीक्षण करतील की, त्यांनी गेल्या 10 वर्षांत जो गदारोळ केला तो कुणाच्याही लक्षात नसेल. गोंधळी खासदारांनी आपल्या मतदार संघाती 100 लोकांना विचारल्यास कुणालाही त्यांचा गोंधळ आठवत नसेल, कुणाला नावही माहीत नसेल. पण, विरोधाचा स्वर तिखट जरी असला, तरी ज्यानी सभागृहात उत्तम विचार मांडले असतील, ते आजही फार मोठ्या वर्गाच्या स्मरणात असतील असे मोदींनी सांगितले.
भविष्यात सभागृहातील चर्चा कुणी बघेल, तेव्हा त्यांचा एक एक शब्द इतिहास म्हणून नोंदवला जाईल. मग भलेही ज्यांनी विरोध केला असेल, मात्र बुद्धीची चुणूक आणि प्रतिभा दाखवली असेल, आमच्या विरोधात कठोर शब्दात मते मांडली असतील. तर देशातील एक मोठा वर्ग, लोकशाही प्रेमी या व्यवहाराचे कौतुक करतील. परंतु, ज्यांनी केवळ नकारात्मकता आणि केवळ गदाररोळच केला असेल त्यांना क्वचितच कुणी स्मरणात ठेवेल. गोंधळी खासदारांसाठी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चूक सुधारण्याची आणि पश्चात्तापाची शेवटची संधी आहे. गोंधळ घालणाऱ्या सर्वच खासदारांना आग्रह करेल की, आपण ही संधी सोडू नका. चांगल्यात चांगले परफॉर्म करा. देश हितार्थ चांगल्यात चांगले विचार सभागृहात मांडा असे पंतप्रधानांनी सांगितले.