दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना पाचव्यांदा नोटीस पाठवली आहे. यापूर्वी चार समन्स बजावल्यानंतरही मुख्यमंत्री केजरीवाल एजन्सीसमोर हजर झाले नव्हते. तर आता त्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य धोरण प्रकरणी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात सुरू असलेल्या तपासासंदर्भात केजरीवाल यांना 2 फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे.
ईडीने 2 नोव्हेंबर 2023 रोजी केजरीवाल यांना पहिले समन्स पाठवले होते आणि ते बेकायदेशीर असल्याचे सांगत ते हजर झाले नाहीत. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी दुसरे समन्स पाठवण्यात आले मात्र त्याला उत्तर देण्यात आले नाही. तिसरे समन्स 3 जानेवारीला पाठवले होते. या समन्सवरही केजरीवाल चौकशीत सहभागी झाले नाहीत. तर चौथे समन्स 13 जानेवारीला पुन्हा पाठवण्यात आले. याला उत्तर देताना सीएम केजरीवाल म्हणाले की, राजकीय द्वेष आणि अजेंडामुळे हे समन्स पाठवले जात आहेत. भाजपला मला अटक करायची आहे, कारण मी लोकसभा निवडणुकीत प्रचार करू नये.
दरम्यान, या मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री केजरीवाल यांना सातत्याने समन्स पाठवले जात आहे.