केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. निवडणूक असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्र सरकारने केलेली चांगली धोरणे आणि काम यामुळे सलग तिसऱ्यांदा भाजपाला सत्तेत परत येण्यास मदत करेल अशी अशा सीतारमण यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्प सादर करताना या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत असे सांगितले.
निर्मला सीतारमण यांनी सहावा आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” या संकल्पनेखाली सर्वसमावेशक विकासासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. निर्मला सीतारमण म्हणाल्या, ”आमच्या सरकारने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास ही मूल्ये मजबूत करण्यासाठी प्रयत्न केली. तसेच सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे.”
निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या, आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांमध्ये २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. ”सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये आमच्या सरकारने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या दृष्टिकोनाला मजबूत केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर करण्यास मंजुरी दिली. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सहावा आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणूक होऊन नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हा अंतरिम अर्थसंकल्प आर्थिक गरजा पूर्ण करेल. दरम्यान नवीन आणि पूर्ण अर्थसंकल्प नवीन सरकार आल्यानंतर सादर केला जाईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली.