काही दिवसांपूर्वी ईडीने बारामती ऍग्रो लिमिटेडवर छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने रोहित पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. २४ जानेवारी रोजी रोहित पवार यांची ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. जवळपास एक तासापासून रोहित पवारांची ईडी चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे रोहित पवारांच्या चौकशीवेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि रोहित पवारांची पत्नी कुंती पवार या देखील उपस्थित आहेत.
मागील वेळेस शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात थांबले होते. तर खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी गेल्या होत्या. ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जवळच्या अंतरावरच आहेत. रोहित पवारांची ईडी चौकशी होणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत या चौकशीचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान 24 जानेवारीला ईडी चौकशीआधी रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “ईडी अधिकारी त्यांचे काम करत असताना त्यांनी मला जी कागदपत्रे मागवली ती मी दिली आहेत. तसेच मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करेन. पण या चौकशीमागे कुठली शक्ती आहे? काय विचार आहेत? हे आत्ताच सांगता येणार नाही. कदाचित आम्ही एका बलाढ्य शक्तीविरोधात लढत आहोत म्हणून ही कारवाई झाली असेल. अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत जी माहिती मागवली आहे ती माहिती आम्ही ईडी, सीआयडी आणि ईडब्ल्यूओही दिली आहे. तीच माहिती आता मी पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात घेऊन जाणार आहे. तसेच मला ईडीचे अधिकारी जे काही प्रश्न विचारतील त्याची उत्तरे आम्ही देऊ”, असेही रोहित पवार म्हणाले.