आज (1 फेब्रुवारी) संसदेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, या अंतरिम अर्थसंकल्पावर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंतरिम अर्थसंकल्पाबाबत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखे काहीही नाही. कारण शेतकरी, महिला, तरूण, पर्यटन, शिक्षण, दळवळण सुधारणे, राज्यांना कर्ज देणे अशा अनेक गोष्टींवर बटेमध्ये लक्ष देण्यात आले आहे. सरकारचा लहान-लहान शहरात मेट्रो आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच कॉर्पोरेट टॅक्सवर सवलत देण्यात आली आहे.
राज्यांना बिनव्याजी कर्ज, मोफत धान्य देण्याचा मोठा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला. तसेच सरकारकडून मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले जात आहेत. तसेच उच्चशिक्षण संस्था तयार करणे, 15 एम्स रूग्णालय उभारणे, पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग, मोफत वीज असे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सोबतच शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी तो सर्वसमावेशक आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.