आज (1 फेब्रुवारी) देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. तर या अर्थसंकल्पावर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला. निर्मला सीतारमण यांना डोकं वापरण्याची मुभा नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण या खूप पावरफुल्ल आहेत, असे मला वाटले होते. तसेच आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना त्या छान घोषणा करतील अशी अपेक्षा मला त्यांच्याकडून होती. पण या अर्थसंकल्पानंतर असे वाटायला लागले आहे की, निर्मला सीतारमण यांच्याही हातात काहीही राहिलेले नाही. त्यांच्यासमोर जो कागद येतो तो त्या वाचतात. त्यापलीकडे त्यांना डोकं वापरण्याची मुभा नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
आजचा अर्थसंकल्प फेलिअर ठरला आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, या घोषणांमध्ये प्रत्यक्षात काहीच नाहीये. या अर्थसंकल्पात फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना फक्त चुना लावलेला आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, या अर्थसंकल्पात शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. बेरोजगार तरूणांसाठी काहीही नियोजन झालेले नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव आहे तसेच आहेत. त्यामुळे हे बजेट अतिशय फेलिअर आहे. यामध्ये भविष्यासाठी कुठलेही नियोजन झालेले नाही, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.