नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, गुरुवारी आपल्या कार्यकाळातील अखेरचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि कल्पक असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
अंतरिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत पंतप्रधान म्हणाले की, आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी सर्वसमावेशक आणि कल्पक आहे. यात सातत्याचा विश्वास असून हा अर्थसंकल्प युवक, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या ४ स्तभांचे सबलीकरण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासोबतच अंतरिम अर्थसंकल्पात २०४७ च्या विकसित भारताचा पाया रचण्याची हमी मिळते.
अर्थसंकल्पात प्राप्तीकर सूट योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे मध्यमवर्गातील एक कोटी लोकांना दिलासा मिळणार आहे. आमच्या आधीच्या सरकारने अनेक दशकांपासून सामान्य माणसाच्या डोक्यावर ही एक मोठी टांगती तलवार ठेवली होती. ती आम्ही बाजूला केली. अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नॅनो डीएपीचा उपयोग, नव्या पशू योजना, पीएम मत्स संपदा योजनेचा विस्तार आणि आत्मनिर्भर तेलबिया अभियान अशा योजनांचा समावेश यात आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच शिवाय खर्चही कमी होईल असे मोदींनी सांगितले.
त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात 2 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संशोधनावर एक लाख कोटींचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअप्सला मिळणाऱ्या करसूटीचा विस्तार करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. वित्तीय तुटीला नियंत्रणात ठेवतानाच भांडवली खर्चाला ११ लाख ११ हजार १११ कोटींपर्यंतच्या ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवण्यात आलं आहे. अर्थतज्ज्ञांच्या भाषेत सांगायचं तर हा एकप्रकारे स्वीट स्पॉट आहे. यामुळे भारतात एकवीसाव्या शतकासाठी आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच युवकांसाठी अगणित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
एक चांगला अर्थसंकल्प मांडल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दिली.