राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली होती. तसेच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. भुजबळांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली होती. तर आता गायकवाड यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गायकवांडांची ही भाषा योग्य नाही, असे भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, संजय गायकवाड जे बोलले ते मी ऐकले आहे. ते ऐकून मला खूप वाईट वाटले. कारण त्यांनी जी भाषा वापरली ती योग्य नाही. आता मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, ते ज्या शिवसेनेत शिकले त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. त्यामुळे त्यांनी भाषा जरा जपून वापरायला पाहिजे, असा खोचक टोला भुजबळांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, राहता राहिला गायकवाडांनी वापरलेल्या भाषेचा प्रश्न तर त्याबद्दल त्यांचे नेते एकनाथ शिंदे बघून घेतील. मला कमरेत लाथ घालून बाहेर काढा अशी भाषा त्यांनी वापरली. तर आता मला मंत्रीमंडळात घ्यायचे की नाही किंवा बाहेर काढायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्री शिंदेंचा अधिकार असेल, तसेच तो मला मान्य असेल.
दरम्यान, मराठा आरक्षणाला छगन भुजबळांनी विरोध केल्यानंतर संजय गायकवाड आक्रमक झाले होते. भुजबळ यांना लाथ घालून मंत्रिमंडळातून हाकलून द्या, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली होती. तसेच एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही समाजाच्या विरोधात असू शकत नाही. आणि असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही, असेही गायकवाड म्हणाले होते.