राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. राज्यसभेतील एकूण १७ राज्यांमधील ५६ सदस्यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. तसेच राज्यसभेतील एकूण ६ सदस्यांचा कार्यकाळ देखील संपणार आहे. २९ फेब्रुवारीला राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या भाजपाची खलबते सुरू झालेली आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात देवेंद फडणवीसांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्याचे कळते आहे. भाजपा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपला चौथा उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये ६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. याबाबतची रणनीती, त्याची तयारी कशी सुरु आहे याची माहिती पक्षश्रेष्ठींना फडणवीसांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाने केलेला करिष्मा हा सर्वांनाच माहिती आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीत काहीतरी जादू करण्याची भाजपाची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भाजपा लवकरच आपल्या पहिल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच मतांची गणित जुळत असल्याचं भाजपा चौथा उमेदवार देखील राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतो असे बोलले जात आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ६ खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री.व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. सध्या भाजपमधील राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना पक्ष पुन्हा संधी देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच सध्या केंद्रात मंत्री असलेल्या नारायण राणे यांना पुन्हा संधी मिळणार की नाही तसेच आताच्या चेहऱ्यानं की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.