झारखंड मुक्ती मोर्चा विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी आज राजभवन येथे राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच चंपाई सोरेन यांच्यासोबत अनेक नेत्यांनीही शपथ घेतली आहे. शपथ घेणाऱ्यांमध्ये काँग्रेस नेते आलमगीर आलम आणि सत्यानंत भोक्ता यांचाही समावेश आहे. रांची येथील राजभवन येथे शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.
आलमगीर आलम आणि सत्यानंत भोक्ता यांचाही चंपाई सोरेन यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. तसेच चंपाई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर चंपाई सोरेन आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
बुधवारी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्री नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर JMM विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी राज्यपालांना विनंती केली होती, त्यांनी लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा मान्य करावा, कारण राज्यात गोंधळाची परिस्थिती आहे.
कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असलेले हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी रात्री ईडीने त्यांना अटक केली. एजन्सीने दिवसातून सात तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी केली होती.