तामिळ सुपरस्टार थलापती विजयने राजकारणात सक्रिय प्रवेश करत स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. ‘तमिळगा वेत्री काझीम’ (Tamilaga Vetri Kazham) असे या पक्षाचे नाव असणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थलापतीने नवी दिल्लीत आपल्या राजकीय पक्षाची नोंद केली आहे.
दक्षिणेत थलापती विजयचा मोठा फॅन फॉलोईंग आहे.तसेच सामाजिक कार्यातही थलापती विजय आघाडीवर असतो. त्यामुळे त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे. ज्याचा त्याला राजकारणात फायदा होऊ शकतो असे मानले जात आहे. एएनआयने एक्स वर पोस्ट करुन थलापती विजयच्या राजकीय पक्षाविषयी माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विजयच्या राजकीय प्रवेशाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.अखेर विजयने त्याच्या राजकीय पक्षाचे नाव जाहीर करुन मोठा निर्णय घेत चाहत्यांना धक्का दिला आहे. सोशल मीडियावरही थलापती विजयचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत. तसेच दक्षिण चित्रपटसृष्टीत थलापती विजयने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. आता राजकारणामध्ये थलापतीची जादू चालते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.