मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. आनंदाची बातमी अशी आहे की, येत्या १९ फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचे उदघाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचे उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राइव्ह या १० किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. तसेच मे महिन्याच्या मध्यापर्यंत दोन्ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.
मुंबईकरांसाठी कोस्टल रोड जितका महत्वाचा आहे तितकाच तो प्रकल्प खर्चिक देखील आहे. कोस्टल रोडमुळे उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प दोन भागांमध्ये विभागण्यात आला आहे. मुंबई ते कांदिवली असे २९ किमी अंतराचा हा कोस्टल रोडचा प्रकल्प आहे. यामध्ये दोन बोगदे देखील असणार आहेत. कोस्टल रोड हा ८ पदरी असणार आहे. तर बोगद्यामध्ये ६ पदरी असणार आहे. मरिन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर सध्या जाण्यासाठी एक तास किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. मात्र कोस्टल रोडमुळे हे अंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येणार आहेत. ते पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवजयांतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पुण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 19 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती असल्याने पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होण्याची शक्यता आहे. सोबतच ते पुणे विमानतळावर नव्याने झालेल्या टर्मिनलचे उद्घाटनही करणार असल्याची चर्चा सुरू आहे.