प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाचा ‘फायटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच हा चित्रपट सुपरहिट ठरला असून तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात दीपिका मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, आता दीपिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम पाहून दीपिका पदुकोण खूपच प्रभावित झाली आहे. त्यामुळे दीपिकाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. तसेच तिने त्यांचे आभारही मानले आहेत.
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने म्हटले आहे की, “प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमचे खूप खूप आभार. परीक्षेचा ताण टाळण्यासाठी तुम्ही शाळेतील मुले, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी ज्या प्रकारे संवाद साधता ते खूप कौतुकास्पद आहे.” यासोबतच दीपिकाने पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची लिंकही शेअर केली आहे.
दीपिकाच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. दरम्यान, नुकतेच राजधानी दिल्लीतील ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी अनेक टिप्स दिल्या होत्या.
फायटर चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर दीपिका यात स्क्वाड्रन लीडर मीनल राठौरची भूमिका साकारत आहे. ‘फायटर’ हा चित्रपट पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर कसे हवाई हल्ले करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.