ज्ञानवापी मशीदीच्या तळघरात हिंदू पक्षाला पुजेसाठी अलाहाबाद हायकोर्टाने परवानगी दिली असून आता ज्ञानवापी मशीद कमिटीला पुन्हा एकदा झटका बसला आहे. तसेच कोर्टाने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे त्याचबरोबर अर्जात सुधारणा करण्याचा सल्लाही मशीद कमिटीला दिला आहे.
हिंदू पक्षांना मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ज्ञानवापी मशीद समितीने अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली होती, या याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टात आज सुनावणी पार पडली.
यावेळी हायकोर्टाने म्हटले आहे की, 17 जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिल्याशिवाय काहीही करता येणार नाही. यावेळी हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या निर्णयाला स्थगितीचा अर्जही नाकारला असून मशीद समितीला 6 फेब्रुवारीपर्यंत अपिलात सुधारणा करण्यास सांगितले आहे. ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजेला परवानगी दिल्याने मुस्लिमांमध्ये नाराजी असल्याचे मशीद व्यवस्था समितीने म्हटले आहे.
तब्बल 31 वर्षांनंतर बुधवारी रात्री उशिरा रात्री 11 वाजता ज्ञानवापी येथील व्यास तळघरात मूर्तींचे पूजन करण्यात आले आहे . यावेळी डीएम आणि पोलिस आयुक्तही उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून गणेश-लक्ष्मीची आरती करण्यात आली. तसेच तळघराच्या भिंतीवरील त्रिशूलासह इतर धार्मिक प्रतिकांचीही यावेळी पूजा करण्यात आली.