रॉकी आणि प्रिडेटरसह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते कार्ल वेदर्स यांचे गुरुवारी निधन झाले आहे. कार्लच्या कुटुंबीयांनी ही बातमी चाहत्यांना दिली असून सर्वांना धक्का बसला आहे. कार्ल वेदर्स हे ७६ वर्षांचे होते. त्यांनी काल म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी जगाचा निरोप घेतला.
कार्ल वेदर्स यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कार्ल हा असाधारण जीवन जगणारा असाधारण व्यक्ती होता. चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपल्या योगदानातून छाप सोडली आहे. त्यांच्या कार्यासाठी जग त्यांची आठवण ठेवेल. तसेच कार्ल एक प्रेमळ भाऊ, वडील, आजोबा, भागीदार आणि मित्र होते.
‘रॉकी’ फ्रँचायझीमध्ये बॉक्सर अपोलो क्रीडची भूमिका साकारणाऱ्या कार्ल वेदर्सच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. याशिवाय अभिनेत्याच्या निधनामुळे इंडस्ट्रीचेही मोठे नुकसान झाले आहे. कार्लच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप सांगितलेले नाही. मात्र, त्यांचा झोपेतच मृत्यू झाला, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
कार्लच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्यांनी नेहमीच उत्कृष्ट काम केले आहे आणि त्यांनी टीव्ही आणि चित्रपट दोन्हीमध्ये काम केले आहे. त्यांनी टीव्हीमध्ये 75 हून अधिक शो केले आहेत. तसेच कार्ल हे रॉकीमध्ये काम करण्यापूर्वी ते एक फुटबॉल खेळाडू होते.