शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. आपसांतील वैमनस्य आणि जमिनीचा वाद यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.
शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्थानकात भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण पूर्ण विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाला. या वादादरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात महेश गायकवाड यांना पाच गोळ्या लागल्या असून त्यांच्या एका समर्थकालाही गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
दरम्यान, उल्हासनगरमध्ये घडलेल्या या गोळीबारानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे. सोबतच त्यांच्यासह असणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.