उल्हासनगरमध्ये शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. आपसांतील वैमनस्य आणि जमिनीचा वाद यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड, संदीप सर्वांकर, हर्षल केणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. जमिनीच्या वादातून हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात महेश गायकवाड यांच्यासह दोन जण जखमी झाले आहेत. तसेच पोलीस स्थानकात हा प्रकार घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अशातच, आता हा गोळीबार का केला? याबाबतचे कारण गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे. गणपत गायकवाड यांनी सांगितले की, “10 वर्षांपूर्वी मी एक जागा घेतली होती. तर या जागेवर शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांनी जबरदस्ती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. महेश गायकवाड हे कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते.”
“काल संध्याकाळी महेश गायकवाड 400 ते 500 जण घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यावेळी माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. मला हा प्रकार सहन झाला नाही. कारण माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील तर माझा जगून काय फायदा? त्यामुळे मी काल रात्री आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला”, असे गणपत गायकवाड यांनी सांगितले.