पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ओडिशा आणि आसाम राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी ओडिशातील IM-संबलपूरच्या नवीन कॅम्पससह दोन्ही राज्यांमधील मोठ्या प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत. तसेच ते आसाम राज्याच्या भाजपाच्या कोअर कमिटीला देखील भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आज दुपारी झारसुगुडा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते IM-संबलपूर कॅम्पसकडे रवाना होणार आहेत. त्याठिकाणी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, राज्यपाल रघुबर दास आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी आज ओडिशामध्ये ६८,००० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे अनावरण देखील करणार आहेत. यामध्ये ते IM-संबलपूरच्या ४०० कोटी रुपयांच्या नवीन कॅम्पसचे देखील अनावरण करणार आहेत. संध्याकाळी गुवाहाटीला जाण्यापूर्वी मोदी रेमेड मैदानावर जाहीर सभेला संबोधित करतील असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आपल्या आसाम राज्याच्या दोऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे अनावरण करतील. पंतप्रधान मोदी हे आज रात्री भाजपाच्या राज्य कोअर कमिटीला भेट देतील आणि पक्षाच्या घडामोडींवर चर्चा करतील असे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांगितले. मोदी उद्या खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय क्रीडांगणावर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या ठिकाणी ते राज्य व केंद्राच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत. कामाख्या मंदिर कॉरिडॉर (४९८ कोटी) आणि गुवाहाटीमधील नवीन विमानतळ टर्मिनलपासून (३५८ कोटी रुपये) सहा लेनचा रस्त्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार आहे.