सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित मंच केंद्रामध्ये अंगणमंचावर ‘रामलीला’ संबंधित एका नाटकाचे सादरीकरण केले जात होते. मात्र त्या नाटकातले संवाद आणि इतर गोष्टी आक्षेपार्ह असल्याच्या कारणांवरून हे नाटक बंद पाडण्यात आले आहे. काल म्हणजेच शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे गोंधळ झाला. तसेच काही जणांमध्ये झटपट देखील झाली. दोन्ही बाजुंनी एकमेकांवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. आता या प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित केंद्राच्या विभाग प्रमुख व सहा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. शुक्रवारी घडलेल्या प्रकारानंतर विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे अंगण मंच आणि प्रमुख इमारतीजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विद्यापीठाच्या विभाग प्रमुखाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास देखील सुरु केला आहे.
शुक्रवारी नक्की काय घडले?
श्रीराम व सीतामाता यांच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्याने, हे नाटक बंद पाडल्याची भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतली आहे. दरम्यान घडलेल्या प्रकारासंदर्भात ललित कला केंद्राचे विभागप्रमुख आणि विद्यापीठाचे कुलसचिव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अभाविपने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात ते म्हणतात,”विभागाकडून सादर केलेल्या नाटकांमध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषका प्रमाणे दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत आणि देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या व आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. हिंदू देवीदेवतां बद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही.संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याची केली जावी.”
रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न या नाटकातून झाल्याचे समजते. जब वी मेट या नावाची ही संहिता असून, विभागाच्या विद्यार्थ्यानेच त्याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. हे नाटक प्रोयगिक आणि प्रहसनात्मक असल्याची माहिती उशीरापर्यंत समजली.
नाटकामध्ये सीतामातेला सिगरेट पिताना दाखवले आहे. सीता मातेचे आणि लक्ष्मणाचे एकमेकांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे दाखवण्यात आला आहे. अशा पद्धतीचं हिंदू देवी-देवतांचा अपमान विद्यापीठात विद्यार्थी परिषद खपून घेणार नाही. विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरण आम्ही दूषित होऊ देणार नाही.
– महादेव रंगा, अभाविप पुणे महानगर सहमंत्री