महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे येत्या 28 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. या चर्चांवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही राज्यसभा निवडणूक लढणार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. राज्यसभा जागा लढवण्यासाठी आमच्याकडे संख्याबळ नाही. आमच्याकडे बहुमत नसल्यामुळे निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी राज्यसभा निवडणूक लढणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे आता भाजप 3, शिंदे गट 1, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 1 असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आलेल्या असतानाच महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावर शरद पवारांनी भाष्य केले. जागावाटपाबाबतची चर्चा चांगली झाली आहे. जागा जिंकणे महत्त्वाचे असेल तर ती जागा कशासाठी जिंकतोय हे देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे 9 ते 10 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा हा तिढा सुटेल, असे शरद पवारांनी सांगितले आहे.