शिवसेना आमदार दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. वृत्तपत्रातून चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करत दादा भुसे यांनी खासदार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्याप्रकरणी मालेगाव न्यायालयात सुनावणी होणार लाहोटी. त्यासाठी संजय राऊतांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज या खटल्यासंदर्भात आज मालेगाव कोर्टात सुनावणी पार पडली. मात्र या सुनावणीस संजय राऊत उपस्थित राहिले नव्हते.
कोर्टात संजय राऊत उपस्थित नसल्याने त्यांच्या वकिलांनी बाजू मंडळी. तर दादा भुसे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली साक्ष नोंदवली. मात्र न्यायालयाने संजय राऊत उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत, असे कोर्टाने म्हटले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या चार टर्मपासून मी मालेगावचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे संपूर्ण मालेगावकरांना माहिती आहे की, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. आजच्या सुनावणीला राऊत यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते.
नक्की काय आहे प्रकरण?
दैनिक सामनामधून दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. दैनिकातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी नाशिकचे पालकमंत्री व मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.