झारखंडमधील जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. तसेच कोर्टाने त्यांना ५ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. चंपाई सोरेन यांनी झारखंडमध्ये सरकार स्थापनेचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी झारखंड विधानसभेत होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात भाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
५ आणि ६ फेब्रुवारी रोजी झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. यासाठी रांची येथील विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती. चंपाई सोरेन सरकारच्या विश्वासदर्शक ठरावात सहभागी होण्यासाठी सोरेन यांनी विशेष पीएमएलए कोर्टात याचिका दाखल केली होती.
ईडीकडून अटक होण्यापूर्वी ३१ जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून चंपाई सोरेन यांची निवड केली. चंपाई सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीनंतर सोरेन यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. चंपाई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ४१ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र सध्या त्यांना ४३ आमदारांनी पाठिंबा दिल्याची माहिती समोर येत आहे.