पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’त आज एका नाटकाचे सादरीकरण बंद पाडण्यात आले. या नाटकातील एका प्रसंगात राम,लक्ष्मण आणि सीता यांचा वेष परिधान केलेले विद्यार्थी म्हणजे चक्क राम सीता एकमेकांना सिगारेट पेटवून देत आहेत,असं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे. सीतेचा वेष परिधान केलेली व्यक्ती जो मुलगा आहे. घाणेरड्या शिव्या देत आहे. यांना सीतेच्या पात्रासाठी एक मुलगी मिळू नये? पण यांना साडी नेसायचा भारी शौक आहे. याला विरोध केला तर काय चुकले?
मागील काही वर्षात नाट्य प्रशिक्षण संस्था, सामाजिक अभ्यासक्रम शिकवले जाणाऱ्या संस्था या कायमच वेगवेगळ्या वादांमुळे प्रसिद्धीस आल्या आहे. यातील सर्वाधिक वाद हे धार्मिकतेशी संबंधित होते. हे सर्व वाद आणि त्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. या सर्व प्रशिक्षण संस्था आहेत. म्हणजे इथे जे काही सादर होतं ते कोणीतरी शिकवलेलं असतं. म्हणजे या प्रत्येक कारनाम्यानमागे एक सुपीक डोकं असतं. हे सर्व घडतं त्यापूर्वी कोणीतरी लिहीत आणि कोणीतरी ते सादर करण्यासाठी प्रशिक्षित करत आणि मग अशाच छोट्या छोट्या सादरीकरणातून या मुलांच्या डोक्यात ते पूर्णतः भिनवलं जातं. प्रायोगिक असलं तरी ते खोलवर रुजतं त्यामुळे खरंतर पहिले भीती निर्माण झाली पाहिजे ते हे निर्माण करणाऱ्यांच्या मनात…
का बघावं इतरांनी सीतेला सिगारेट पिताना आणि शिव्या देताना? नेहमी हिंदू देवी देवतांचा अपमान आणि व्यंगच चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून का दाखविले जाते? आजपर्यंत कधीही विरोध झाला नाही पण यापुढे हा विरोध होणार हे देशातील एकूणच वातावरणात स्पष्ट दिसतंय. अशावेळी विद्यापीठे आणि संस्थानी विषय पडताळून घेणं गरजेचं नाही वाटतं का? बरं हा सर्व ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा मुद्दा आणि स्वातंत्र्य आहे, असं जरी म्हणलं तरीही आपली विचारसरणी आणि बावळटपणा इतरांनी का सहन करावा? आज जो वाद झाला याबाबत ललित कलाच्या संचालकांनी माफीच मागायला हवी कारण ही परिस्थिती ओढावेपर्यँत विभागाने डोळेझाक केली. मुलांवर हल्ला झाला असेल तर त्याची चौकशीही करावी. पण या गोंधळाची सर्व जबाबदारीही घेणं तितकंच गरजेचं आहे. मुलांवर हल्ला झाला का? तर नाही कोणालाही मारहाण देखील झाली नाहीये याचे व्हिडिओ ही फिरत आहेत.
आम्ही जिजस नेहमी अगदी प्रेमळ, शांत आणि स्मितहास्य करतानाच पाहिला आहे. कोणीही जीजस रस्त्यावर नाचत फिरतोय, शिव्या देतोय असा बघितलं आहे? अल्लाह म्हणजे नेमकं काय? कोणाची प्रतिमा, चेहरा असं कधीही तुम्ही चित्रपटात पाहिलं आहे? एक बुरखा घातलेली महिला आणि पायाच्या घोट्यापर्यंत पॅन्ट, शर्ट आणि डोक्यावर विशिष्ट गोल टोपी घातलेला पुरुष जो अगदी मनोभावे आपल्या धर्माचे पालन करतोय असं दाखवलं जातं. हे पाहिलं की ही व्यक्ती मुस्लिम आहे हे पटकन आपल्याला कळतं. मग सर्रास चित्रपटात, नाटकांत देवी, देवतांचे वेष धारण करून संबंधित पात्र विचित्र व्यंगात्मक वागते, बोलते, फिरतेय हे का सहन करावं? जी भीती जीजस आणि अल्लाहच व्यंग करताना वाटते ती भीती यापुढे हिंदू देवी, देवता दाखवताना वाटलीच पाहिजे. यात चुकीचं काय आहे? ही धर्मांधता कशी असू शकते?
किरण मानेसारखा अगदी सुमार नट खरंतर दखल घेण्याची आवश्यकता ही नाही असा, पण त्याने अभाविपच्या कार्यकर्ते तथा विद्यार्थी यांच्यासाठी वापरलेला ‘धर्मांध’ हा शब्द त्याच्या पोस्टची दखल घेण्यास भाग पाडतो. या ‘धर्मांध’ मुलांनी हल्ला करत शो बंद पाडला म्हणे…
मानेंना अभंग लवकर कळतात. म्हणून त्याच्यासाठी अभंगातील या ओळी : ‘भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि |’
या मानेंनी नुकतीच उद्धव ठाकरे गटाची शिवसेना जॉईन केलीय. जी व्यक्ती हिंदू धर्माच्या प्रतिकांच्या आक्षेपार्ह विधानांना विरोध करणाऱ्यांना ‘धर्मांध’ म्हणते आहे अशी व्यक्ती आता यापुढे ठाकरेंची विचारधारा पुढे घेऊन जाणार आहे म्हणे…म्हणजे किती हा सावळा गोंधळ
या क्षेत्रातील अतिशय ज्येष्ठ व्यक्तीशी याबाबत मी बोलले. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, मुलांची यात काहीच चूक नाही. आज नाटक, चित्रपट आणि एकूणच या माध्यमांमध्ये जे गुरू आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या विचारसारणींचे पडदे आहेत. आमच्यावरही होते पण आम्ही पूर्वी जेव्हा एखादं पात्र साकार करायचो तेव्हा ते पात्र आपल्या विचारधारेशी मिळतं जुळतं असो किंवा नसो दिलेल्या पात्राचा वेष परिधान केला की आम्ही पूर्णतः त्यात एकरूप व्हायचो. त्या पोशाखाचा आणि त्या व्यक्तिरेखेचा आदर सन्मान करण्याची सवय आम्हाला आमच्या प्रशिक्षक, गुरूंनी लावली. आज तसं नाहीये आज पालक लाखो रुपये भरून मुलांना नाटक, सिनेमा शिकविण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे ही पारंपरिक मूल्य आता काही कामाची नाही असं मुलांना वाटतं आहे. मुलांना ग्लॅमरस चित्रपट, नाटकं आणि व्यसन, शिव्या हे अधिक प्रसिध्द करणारे आहेत असं वाटतं. यातून पारंपरिक मूल्ये संपली म्हणून त्यांना त्या व्यक्तिरेखा, पोशाख आणि भूमिका याचं कोणतंही गांभीर्य राहिलेलं नाही.
गायत्री श्रीगोंदेकर
सौजन्य -सोशल मीडिया