दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक आज दिल्ली सरकार मधल्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी मार्लेना यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशी यांनी आपल्या कॅम्प ऑफिसमधील अधिकाऱ्यांना त्यांच्या अनुपस्थितीत समन्स प्राप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. .
तत्पूर्वी, शनिवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आपचे संस्थापक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली होती. याच आरोपांप्रकरणी क्राईम ब्रांचची टीम नोटीस घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. पण केजरीवाल त्यावेळी घरी नसल्यामुळे पोलिसांची त्यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पोलीस नोटीस न देताच माघारी परतल्याची माहिती समोर आली आहे.
“भाजपने ‘ऑपरेशन लोटस 2.0’ सुरू केले आहे आणि दिल्लीतील लोकशाही मार्गाने निवडून आलेले ‘आप’ सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ‘आप’च्या तब्बल 7 आमदारांशी भाजपने संपर्क साधला असून अरविंद केजरीवाल यांना लवकरच अटक केली जाईल, असा आरोप अतिशी यांनी केला होता तसेच ‘ऑपरेशन लोटस 2.0’ वरील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप ‘आप’कडे आहे आणि गरज पडल्यास ती प्रसिद्ध करू,” असा दावाही आप कडून करण्यात आला होता.
आम आदमीच्या वतीने आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित दावा केला होता. त्यानंतर आम आदमीच्या या आरोपांना भाजपकडून चॅलेंज देण्यात आले होते की , ज्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला त्यांची नावे जाहीर करा. भाजपचे दिल्ली सचिव हरीश खुराना यांनी हे चॅलेंज दिले असून आता या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
तथापि, दिल्लीमध्ये आपले सरकार पाडण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस 2.0’ रचल्याचा AAPचा दावा भाजपने फेटाळला आहे.