सध्या वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे यंदा कोणत्याच ऋतूचा अंदाज येईनासा झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार आज महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे देशासह राज्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे. दरम्यान, आज वीकेंडला पावसाची शक्यता असून त्यानंतर उद्यापासून राज्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातही काही भागात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर औरंगाबादसाठी पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हुडहुडी भरविणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे थंडी काहीशी कमी झाली होती. मात्र उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा हा प्रभाव कमी-जास्त होत असल्याने वातावरणात सतत बदल आढळून येत आहे.