मराठी शाळा टिकल्या पाहिजे यासाठी मराठी शाळांचे स्वरूप देखील बदलले पाहिजे. इंग्रजी भाषा महत्वाची आहेच मात्र मराठी भाषेकडे लक्ष द्यायला हवे, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अमळनेर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मराठी भाषा अनिवार्य व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. मराठी पाट्या, शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करणे यासाठी आमचा प्रयत्न आहे. विधान परिषदेची उपसभापती या नात्याने मी सरकारला सूचना दिल्या आहेत. साने गुरुजी यांची सर्व पुस्तके मी वाचली आहेत. खरा तो एकची धर्म… या गीता प्रमाणे साने गुरुजींचे विचार समाजापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. अमळनेर मध्ये त्यांचे स्मारक जरूर व्हावे पण यासोबत साने गुरुजींचे विचार समाजापर्यंत पोहचण्यासाठी कथामाला घ्यावेत, असेही त्यांनी नमूद केले.
सोशल मीडिया मुळे मराठी भाषेला जीवनदान मिळाले आहे. ओटीटी वर मराठी चित्रपट येत आहेत. ही सुखद बाब असली तरी मराठी चित्रपट चित्रपट गृहातच जाऊन पाहिले पाहिजे. मराठी भाषा व साहित्य क्षेत्राचे महत्त्व केवळ पुणे व मुंबई सारख्या मोठ्या शहरांपुरता नाही. यंदाचे साहित्य संमेलन अमळनेर सारख्या लहान शहरात होत आहे, ही स्वागतार्ह बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक व खान्देश शिक्षण मंडळाचे नीरज अग्रावल उपस्थित होते.